सासरचा जाच असह्य; गर्भवती नवविवाहितेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या; मेहकर तालुक्यातील माळेगाव येथील धक्कादायक घटना; पतीसह सासू-सासऱ्यांना अटक !
Dec 24, 2025, 10:51 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सासरच्या लोकांचा जाच असह्य झाल्याने २१ वर्षीय गर्भवती नवविवाहितेने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील आदिवासी बहुल माळेगाव येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पतीसह सासू-सासऱ्यांना अटक केली आहे. साधना विष्णू चोडकर (वय २१) असे मृतक विवाहितेचे नाव आहे.
माळेगाव येथील साधना विष्णू चोडकर यांचा विवाह २०२४ मध्ये झाला होता. २३ डिसेंबर रोजी सकाळी साधनाने गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत उडी घेतल्याची माहिती पोलीस पाटील यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.घटनेची माहिती मिळताच मृतक महिलेचे माहेर असलेल्या वाकदवाडी (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील नातेवाईक माळेगाव येथे दाखल झाले. “सासरच्या लोकांकडून मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता. या मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. जोपर्यंत पती, सासू व सासरे यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा संतप्त पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. सासू-सासऱ्यांना अटक करण्यात आली, तर पती विष्णू रामाभाऊ चोडकर याला मोबाईल लोकेशनच्या आधारे नगर येथून अटक करण्यात आली. आरोपींना अटक झाल्याची खात्री पोलिसांनी व्हिडीओ कॉलद्वारे नातेवाईकांना दिल्यानंतर दुपारी सुमारे ४ वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनीही माळेगाव येथे भेट दिली.
कौटुंबिक अत्याचार सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद असून, माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.