“उन्हाचा कहर वाढतोय! उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन”
Apr 17, 2026, 11:31 IST
बुलढाणा (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले आहे. उष्माघाताचे परिणाम गंभीर ठरू शकतात, त्यामुळे वेळेवर योग्य प्रथमोपचार आणि आवश्यक खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उष्माघाताचा त्रास झाल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवणे गरजेचे आहे. घट्ट कपडे सैल करून शरीरावर थंड पाण्याच्या ओल्या पट्ट्या ठेवाव्यात. रुग्णाला हवा मिळण्यासाठी पंख्याचा वापर करावा आणि पायाखाली उशी ठेवून आरामदायी स्थितीत ठेवावे. व्यक्ती शुद्धीत असल्यास थंड पाणी हळूहळू द्यावे, मात्र बेशुद्ध अवस्थेत काहीही खायला किंवा पिण्यास देऊ नये. उलटी होत असल्यास रुग्णाला एका बाजूला झोपवणे आवश्यक असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले.
उन्हाच्या लाटेदरम्यान हलके व पचायला सोपे अन्न, ताजी फळे आणि सॅलडचा आहार घ्यावा. पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे असून सूती, सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. घराबाहेर पडताना टोपी, छत्री, गॉगल यांचा वापर करावा तसेच प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करावी आणि मैदानी कामांदरम्यान वेळोवेळी विश्रांती घ्यावी.
तसेच घराबाहेर पडण्यापूर्वी पाणी पिणे, डोके झाकणे आणि लिंबूपाणी, ओआरएस, आंबा पन्हे यांसारख्या द्रवपदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. रिकाम्या पोटी बाहेर पडणे, उन्हात दीर्घकाळ राहणे तसेच तिखट, मसालेदार व जड अन्न टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान अत्याधिक वाढलेले असेल, ती बेशुद्ध किंवा गोंधळलेल्या अवस्थेत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तात्काळ १०८ किंवा १०२ या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधून वैद्यकीय मदत घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःसह कुटुंबाचे संरक्षण करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.