भरधाव ट्रॅक्टरने बालिकेला चिरडले; सावरगाव नेहू येथे विजयादशमीच्या दिवशी भीषण अपघात...
Oct 4, 2025, 11:10 IST
नांदुरा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव ट्रॅक्टरने बालिकेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेहु येथे २ ऑक्टोबर रोजी घडली. विजयादशमीच्या दिवशीच हा भीषण अपघात घडला. गायत्री खंडारे असे मृतक मुलीचे नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच नांदुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मृत मुलगी अल्पवयीन असल्याने आणि घटनेला सामाजिक पार्श्वभूमी लाभल्याने गावात व परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.