जळक्याला चांगलं दिसलं नाही! शेतकऱ्याचा गोठा दिला पेटवून; बकऱ्या, बोकड, पिल्ले तडफडून मेली; शेती उपयोगी साहित्याची झाली राख! पिंपळगाव सराई येथील घटना..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपळगाव सराई शिवारात एक संतापजनक घटना समोर आली. या घटनेने अनेकांची मन गहिवरून आले. एका अज्ञात जळक्या भामट्याला शेतकऱ्याची प्रगती सहन झाली नाही, त्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने शेतकऱ्याचा गोठाच पेटवून दिला. यामुळे गोठ्यातील दोन उच्च प्रतीच्या जमुना पुरी जातीच्या बकऱ्या,  ३ बोकड व बकरीची दोन पिल्ले जळून मृत झाली. याशिवाय गोठ्यातील खत व शेती उपयोगी अन्य साहित्यही जळून खाक झाले. शेतकरी विठ्ठल टेकाळे यांनी  या प्रकरणाची तक्रार रायपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.  पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जळक्या आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ बेड्या ठोकाव्यात अशी मागणी जनमानसातून समोर येत आहे..
विठ्ठल शंकर टेकाळे (४५) यांची पिंपळगाव सराई शिवारात गट नंबर ६६ मध्ये शेती आहे. शेतात त्यांनी तीन शेड केलेले असून त्यात बकऱ्या व शेती उपयोगी साहित्य असते. १९ जुलै च्या रात्री गोठा बंद करून ते घरी आले होते. काल,२० जुलैच्या सकाळी चारा पाणी करण्यासाठी ते शेतात गेले असता त्यांना गोठ्यातून धूर निघत असताना दिसला. त्यांनी गावातील मंडळींना सोबत घेत गोठ्याला लागलेली आग विझवली. गोठ्यात पाहणी केल्यावर २ जमुनापुरी जातीच्या बकऱ्या, ३ बोकड व २ बकरीची पिल्ले जळून मृत झालेली दिसली. याशिवाय पेट्रोल पंप, केबल, सरदार कंपनीचे तीन बॅग खत, युरिया, थ्रेशर मशीनच्या ३ चाळण्या, तूर सोयाबीन व हरभऱ्याचे ३ ट्रॉल्या कुटार , स्प्रिंकलरच्या तोट्या, तीन लोखंडी टिन असे साहित्य जळून गेले शेतकऱ्याची जवळपास दीड लाख रुपयांची नुकसान झाले आहे. हे काम कोणत्या जळक्याने केले ? याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणीही समोर येत आहे...