मैदानी चाचणी दिली… चार तासांत काळाने हिसकावला जीव; रेल्वे पोलिस भरतीसाठी मुंबईला गेलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत..

 
 बावनबीर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्य रेल्वे पोलिस दलाच्या भरतीसाठी मोठ्या आशेने मुंबई गाठलेल्या युवकाचा मैदानी चाचणी पूर्ण केल्यानंतर अवघ्या चार तासांत मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अर्जुन उर्फ अक्षय तुळशीराम मसाळ (३०, रा. बावनबीर) असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
२३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारास घाटकोपर येथील लोहमार्ग पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर मैदानी परीक्षा देऊन अक्षय मित्रांसह बाहेर पडला. शारीरिक चाचणीत त्याने १०० मीटर ते १,६०० मीटर धाव पूर्ण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सकाळी ११:३८ वाजता तो भरती केंद्राबाहेर पडला.
काही अंतर चालल्यानंतर थकवा जाणवल्याने त्याने जवळील साई मंदिरात थोडा विसावा घेण्याचे ठरवले. मात्र तेथे विश्रांती घेत असताना अचानक त्याला भोवळ येऊन फिट आली आणि तो बेशुद्ध पडला. मित्रांनी तातडीने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी दुपारी त्याला मृत घोषित केले.
उत्तरीय तपासणीनंतर २५ फेब्रुवारी रोजी बावनबीर येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा आप्तपरिवार आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न डोळ्यांत साठवून गेलेल्या अक्षयच्या अकाली जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.