जिल्हा पुन्हा हादरला! १२ जणांनी घरात घुसून केला तरुणाचा मर्डर; संग्रामपूर तालुक्यातील धक्कादायक घटना....
या घटनेनंतर तामगाव पोलीस ठाण्यात मध्यरात्री १२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सर्व आरोपींना शुक्रवारी अटक केली आहे. दोन्ही समुदाय आक्रमक स्वभावाचे मानले जात असल्याने आणि घटनेत एका युवकाचा मृत्यू झाल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तामगावचे ठाणेदार, अधिकारी व कर्मचारी गावात तळ ठोकून आहेत.
आरोपींची नावे
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मंगलसिंग जालमसिंग सोळंके (५५), जीवनसिंग झामसिंग सोळंके (५२), वैभव मोहनसिंग सोळंके (२२), अमोल जीवनसिंग सोळंके (२७), सुरज मंगलसिंग सोळंके (२८), आकाश मंगलसिंग सोळंके (२७), ईश्वर उर्फ बारक्या मोहनसिंग सोळंके (२२), मानसिंग विजयसिंग सोळंके (३०), राजेश विजयसिंग सोळंके (२३), अजय घनश्याम पवार (१९), दत्ता घनश्याम पवार (२२) व महेश शिवहरी सोळंके (३०) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी निवाना येथीलच रहिवासी आहेत.
घटनेचा तपशील
गुरुवारी रात्री आरोपींनी गैरकायदेशीर जमाव करून हातात तलवारी, कोयते घेऊन ऋषिकेश मोहे यांच्या घरात घुसकावले. त्यांनी कुटुंबीयांना मारहाण केली व “सोपान दिगंबर सोळंके याच्यावरची विनयभंगाची केस मागे घ्या” असा दबाव आणला. या दरम्यान आरोपींनी ऋषिकेशवर धारदार शस्त्राने वार करत त्याला ठार मारले. तसेच फिर्यादी प्रज्ज्वल मोहे व त्यांच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांची कारवाई...
फिर्यादी प्रज्ज्वल मोहे यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, १०३(१), ११८(१), ३३३ व ३५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.
या घटनेनंतर गावात प्रचंड भीती व संतापाचे वातावरण असून, पोलिसांकडून सतत परिस्थितीवर बारीक नजर ठेवली जात आहे.