वाळू माफियांची दादागिरी! तहसीलदारांना अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी; तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
May 14, 2025, 13:15 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा:स्वप्निल देशमुख): संग्रामपूर तालुक्यात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन सक्रिय झाले असताना, वाळू माफियांकडून शासकीय अधिकाऱ्यांना खुलेआम धमक्या दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दि. १२ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक भोन गावाजवळील पूर्णा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी कारवाईसाठी गेले असता, एक गंभीर घटना घडली.
कारवाईदरम्यान एक ट्रॅक्टर पथकाला पाहून पळून गेला, तर त्या ठिकाणी तीन इसम वाळूच्या ढिगाऱ्याजवळ संशयास्पद हालचाली करताना सापडले. त्यांच्याकडे एक हिरो स्प्लेंडर (MH 28 BX 7266) मोटारसायकल होती. चौकशी केली असता सागर उमाळे आणि नामदेव थारकर (दोघेही रा. पहूरपुर्णा) यांनी आपली ओळख सांगितली. मात्र, तिसऱ्या इसमाने नाव सांगण्यास स्पष्ट नकार दिला.
या तिघांपैकी सागर उमाळे याने तहसीलदारांना उद्देशून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत "नदी काय तुमच्या बापाची आहे का?" असे म्हणत अपमानास्पद वर्तन केले. त्याने "आम्ही शेगावकडे वाळू वाहतूक करतो, संग्रामपूरशी काही संबंध नाही", असे म्हणत दादागिरी केली.
यानंतर नामदेव थारकर यानेही तहसीलदारांना धमकी देत, "दम असेल तर थांबा, तुम्हाला विना नंबरच्या वाहनाने चिरडतो. तुमच्यावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करतो" असा गंभीर इशारा दिला.
तहसीलदार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या तिघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली, जिवे मारण्याची तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.
या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम २९६, २२१, ३५१(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तामगाव पोलीस करत आहेत.