देऊळगाव राजात पडक्या घरात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून तपास सुरू...

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातील संजय नगर परिसरातील एका पडक्या घरात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने जन्मानंतर अर्भक निर्जनस्थळी आणून टाकल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून, या घटनेचा तपास देऊळगाव राजा पोलिसांकडून सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता कुवारे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी नितीन मिंड आणि जितेंद्र जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनास्थळावरील संभाव्य पुरावे सुरक्षित करण्याची कार्यवाही सुरू केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाची विटंबना केल्याने प्राथमिक पाहणीत अर्भक स्त्री जातीचे आहे की पुरुष जातीचे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदन व वैद्यकीय अहवालानंतर अर्भकाच्या मृत्यूचे नेमके कारण, जन्माची वेळ आणि इतर महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अर्भकाला येथे कोणी आणून टाकले आणि ते नेमके केव्हा येथे आणण्यात आले, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच संभाव्य रुग्णालये व प्रसूतीसंबंधी नोंदींचीही माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील दोषी व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.