पुलाच्या सहा फूट खोल खड्ड्यात दुचाकी कोसळली; दाम्पत्य गंभीर जखमी

 
 सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बांधकामासाठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्ड्यात दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी झोटिंगा फाट्याजवळ घडली.
तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील किसन ढवळे हे पत्नी लीलावती ढवळे यांच्यासह दुचाकीने प्रवास करत असताना झोटिंगा फाट्यानजीक रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे अपघात झाला. अमडापूर ते दुसरबीड या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सध्या वेगात सुरू असून, पुलाच्या बांधकामासाठी पाइप टाकण्याकरिता मोठा खड्डा खोदण्यात आला आहे.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी कोणतेही सूचना फलक, बॅरिकेड्स अथवा सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. सायंकाळी अंधार पडल्यानंतर खड्डा नजरेस न पडल्याने हा अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी या मार्गावर अपघातांच्या घटना वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.अपघातात गंभीर जखमी झालेल्या ढवळे दाम्पत्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.