अल्पवयीन चिमुकलीची छेड काढणारा आरोपी मोकाट! महिलांनी एसपी ऑफिसवर दिली धडक......

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र ४ दिवस उलटून देखील आरोपीला अटक न केल्याने गावातील महिलांनी आक्रमक होत बुलढाणा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली...
मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात १३ वर्षी अल्पवयीन मुलीची एका भामट्याने छेड काढली होती. २३ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेनंतर बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र ४ दिवस उलटले तरी आरोपीला अटक नाही. उलट प्रकरण मिटवण्याकरताच दबाव येत असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी एसपी विश्व पानसरे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. आरोपीला अटक तर नाहीच उलट तक्रारदाराच्या नातेवाईकांवर गंभीर गुन्हे दाखल करून गुन्हे मागे घ्या अशा धमक्या देत असल्याचा आरोपही निवेदनात महिलांनी केला आहे . त्यामुळे विनयभंग प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी महिलांनी व ग्रामस्थांनी केली आहे.