समृद्धीवर "ट्रॅव्हल्स" चा अपघात! ट्रकला मागून धडकली ट्रॅव्हल्स.. २४ प्रवासी जखमी...१५ प्रवासी.

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ एका खाजगी ट्रॅव्हल्सने समोर जाणाऱ्या अज्ञात ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील एकूण २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी आहेत. जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीवर प्राथमिक उपचारानंतर नातेवाईक खाजगी व इतरत्र उपचारासाठी घेऊन गेले.

मेहकर जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर चॅनल नंबर २७८.८०० जवळ ८ जूनच्या पहाटे ४ वाजण्यापूर्वी हा अपघात घडला. एमएच-३१-एफसी-७४६८ क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन पुणे येथून नागपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स समोर चाललेल्या एका अज्ञात ट्रकला पाठीमागून धडकली. अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.


 अपघातात प्रणाली उमेश खोरगडे (खापरखेडा), अभय श्याम पवनिकार (पुणे), आमरा झैब हुसेन (नागपूर), सुमन रॉय (नागपूर) , शुभांगी सचिन बेनवाल (नागपूर), रितेश प्रल्हाद किंकरे (बुलढाणा), प्रथा सुनील शर्मा (नागपूर), वंदना चंद्रशेखर शेंद्रे (नागपूर), प्रदिप जी. तागे (नागपूर), यश बैनलवार (नागपूर), पुरुषोत्तम शिवाजी भिमान (चंद्रपूर), मधू अनिल तैलानी (नागपूर), अरुणा दिनेश महोरे (नागपूर) अनिल तोमल तैलानी (नागपुर), अमोल मधुकर साळुंके (नागपुर), शुभम सावळाराम सिरसाट (बीड), नाझ झैब हुसेन (नागपूर) , अस्का झैब हुसेन (नागपूर), सक्षम खोरगडे (खापरखेडा), युविका खोरगडे (खापरखेडा), चांदणी खमाने (नागपूर), सुरज लक्ष्मण मोरे (नागपूर), विलासू भगवान काके (पुणे), प्रांजली प्रमोद लुटे (नागपूर), चालक संभाजी राजाराम वाळूज (अहिल्यानगर), प्रकाश भास्कर कपागार (अहिल्यानगर), चंद्रशेखर रामकृष्ण शिंदे (नागपूर) हे जखमी झाले.


 कंट्रोल रूम छत्रपती संभाजीनगर कडून माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्र फर्दापूरचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद तिरणकर यांच्यासह पोलीस कर्मचारी व मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, उपनिरीक्षक कांचन जारवाल यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अपघाताची भीषणता पाहून तातडीने १०८ रुग्णवाहिका पाचारण करण्यात येवून सर्व जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.