साक्षगंधासाठी आलेल्या मित्रांचा अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, एक गंभीर....

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : साक्षगंधासाठी आलेल्या दोघा मित्रांच्या दुचाकीला अपघात होऊन एकाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आडविहिर फाट्याजवळ १७ जून रोजी घडली. मृत युवक गणेश डोंगरदिवे हा मुंबई पोलिस दलात कार्यरत होता.
नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील शे. वसीम शे. युनूस यांचा साक्षगंध सोहळा मोताळा येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी आलेले लोणी लव्हाळा येथील फारुख खान आणि मेरा येथील गणेश डोंगरदिवे हे दुचाकीने शेंबा येथे परत जात असताना आडविहिर फाट्याजवळील वळणावर त्यांची दुचाकी साईड गार्डवर आदळली.
अपघात इतका भीषण होता की एकजण थेट साईड गार्डवर आदळला, तर दुसरा रस्त्याच्या बाहेर फेकला गेला. अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सारंग नवलकार, नायक पोलिस कॉन्स्टेबल मंगेश पवार, पोलिस कॉन्स्टेबल गणेश बरडे आणि आकाश यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांच्या मदतीने दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी गणेश डोंगरदिवे यांना मृत घोषित केले, तर गंभीर जखमी फारुख खान यांच्यावर पुढील उपचारांसाठी संभाजनगर येथे हलविण्यात आले. अपघाताने शोककळा पसरली असून गणेश डोंगरदिवे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.