शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण? अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप! देऊळगाव साकर्शा येथील घटना; जानेफळ पोलिसांनी दाखल केला शिक्षकाविरुद्ध गुन्हा...
प्रविण बाळकृष्ण नगरनाईक असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार दिनांक १४ ऑगस्ट रोजी दुपारच्या स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असताना हा प्रकार घडला. वर्ग ९ व्या वर्गात शिकणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना शिक्षक प्रवीण नगरनाईक यांनी किरकोळ कारणावरून मारहाण केली. वर्गात सर्वांसमोर अश्लील शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाला या बाबतची माहिती मिळताच कारवाई सुरू करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पर्यवेक्षक सागर नरवाडे,केस वर्कर मुकेश मोरे यांना तातडीने जानेफळ पोलिस ठाण्यात पाठवले. पीडित विद्यार्थी आणि पालकांची भेट घेण्यात आली, प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेत आई वडिलांसमोर बालकांना विश्वासात घेऊन विचारपूस झाली. त्यानंतर एका पालकाच्या तक्रारीवरून जानेफळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला..