'रात्री शेतात संशयास्पद हालचाली; चेहऱ्याला रुमाल बांधून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडलं! जळगाव जामोदमध्ये खळबळ'
तक्रारीनुसार , ही कारवाई ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी रवीकांत बावस्कर हे शासकीय वाहनातून गस्तीवर असताना कौलखेड प्र परिसरातील निलेश लक्ष्मण खिरोडकर यांच्या शेताजवळ एक संशयित इसम विनांबरच्या मोटारसायकलसह अंधारात फिरताना आढळला.
पोलिसांनी त्याला थांबवून नाव व फिरण्याचे कारण विचारले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्याने तसेच स्वतःची ओळख लपवून तो अंधारात वावरत असल्याने पोलिसांना संशय आला.तपासादरम्यान संबंधित इसमाचे नाव अविनाश दिलीप जाधव (वय ३२, रा. जळगाव जामोद) असे निष्पन्न झाले. संशयित इसम गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १२२ अंतर्गत गुन्हा नोंदविला.
या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत .