प्रेमसंबंधांचा संशय, बापाने आणि भावानेच कापले मुलीचे मुंडके! नंतर जंगलात जाळला मृतदेह! जळगाव जामोद येथील थरारक खून प्रकरणाची उकल; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पिता-पुत्र अटकेत...

 
 जळगाव जामोद (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात २६ एप्रिल रोजी आढळून आलेल्या एका तरुणीच्या शिर नसलेल्या व अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या निर्घृण हत्याकांडामागे मृत तरुणीचे वडील आणि सख्खा भाऊच असल्याचे समोर आले असून स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. प्रेमसंबंधांच्या संशयातून संतापाच्या भरात वडिलांनी मुलीच्या डोक्यात बांबू मारून हत्या केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे.

या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे शिर धडावेगळे करून प्रेत जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 शिर नसलेला मृतदेह सापडल्याने खळबळ

२६ एप्रिल रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारातील आसिफ मुल्लाजी यांच्या शेतात एका २० ते २५ वर्षीय तरुणीचा शिर नसलेला व अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे शिर वेगळे करून प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व २३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तपासाची सूत्रे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवली.
तपासासाठी मध्यप्रदेश, अमरावती, अकोला येथे पथकांची धाव
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने अकोला, अमरावती, मध्यप्रदेश आणि खान्देश परिसरात तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, बेपत्ता महिलांची माहिती आणि विविध पोलिस ठाण्यांतील नोंदी तपासत तपास सुरू होता.
दरम्यान, ९ मे रोजी पोलिसांना मध्यप्रदेशातील खकणार पोलीस स्टेशनमध्ये शिवानी बापूराम कलमेकर नावाची विवाहित तरुणी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तिचे वडील बापूराम नथ्थु कलमेकर (वय ५३) व भाऊ अजय बापूराम कलमेकर (वय २७, रा. खडकी, ता. खकणार, जि. बुरहानपूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
“प्रेमसंबंध संपत नव्हते”, म्हणून मुलीचा खून
चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानीचा विवाह १५ एप्रिल २०२६ रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील प्रकाश भिलावेकर याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतरही शिवानीचे तिच्या एका चुलत भावासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय कुटुंबीयांना होता. यावरून घरात सतत वाद होत होते.
२३ एप्रिलच्या रात्री रागाच्या भरात वडील बापूराम कलमेकर यांनी शिवानीच्या डोक्यात बांबूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी मृतदेह एक दिवस घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी वडील आणि मुलगा यांनी मोटारसायकलवर मृतदेह राजुरा शिवारात आणला.
तेथे ओळख पटू नये म्हणून शिवानीचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले आणि मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली.
 मुलगी बेपत्ता असल्याची दिली होती तक्रार
विशेष म्हणजे, आरोपी बापूराम कलमेकर यांनीच १ मे रोजी खकणार पोलीस स्टेशनमध्ये त्यांची विवाहित मुलगी शिवानी प्रकाश भिलावेकर (वय २५, रा. खाऱ्या टेंभूर, ता. धारणी, जि. अमरावती) ही २५ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. खकणार पोलिसांनी त्यावर मिसिंग दाखल केली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या कसून चौकशीत अखेर या खुनाचा थरारक उलगडा झाला.
 या अधिकाऱ्यांनी केली मोठी कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोउपनि. पंकज सपकाळे, पोहेकॉ. एजाज खान, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोकॉ. अजीज परसुवाले, अमोल शेजोळ, मंगेश सनगाळे, अमोल वनारे, दीपक वायाळ, राकेश नायडू, समाधान टेकाळे, शिवानंद हेलगे तसेच तांत्रिक विश्लेषण पथकातील कैलाश ठोंबरे यांचा समावेश होता.