पैशांच्या व्यवहारातून ऊसतोड मजुराचे अपहरण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील जानेफळ पोलीस ठाणे हद्दीत ऊसतोड मजुराच्या अपहरणप्रकरणी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांच्या व्यवहाराच्या वादातून मजुराला जबरदस्तीने कारमध्ये कोंबून रात्रभर डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सावरगाव (जि.अकोला) येथील देविदास सूर्यभान राठोड (वय ५०) हे ७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास पारखेड फाट्यावर काम करत असताना आरोपी शामराव बाबुसिंग राठोड, संदीप जाधव, तेजराव राठोड व धोडीराम जाधव (सर्व रा. पारखेड) यांनी तेथे जाऊन “ऊसतोडीचा हिशोब करायचा आहे, आमच्यासोबत चल,” असे सांगत त्यांना सोबत येण्यास भाग पाडले. राठोड यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना जबरदस्तीने उचलून कारमध्ये कोंबले व अज्ञात ठिकाणी नेले.

तेथे आरोपींनी “तू आमच्याकडून एक लाख रुपये घेतले असून ते परत दे किंवा काम पूर्ण कर,” अशी मागणी केली. यावर राठोड यांनी पूर्वीच ३० हजार रुपये दिले असून काम पूर्ण केल्याचे सांगितले असता आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रात्रभर कारमध्ये डांबून ठेवले तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ७ वाजता लघुशंकेचे निमित्त करून देविदास राठोड आरोपींच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अतुल पचार करीत आहेत.