अचानक सुरू झाला विद्युत पुरवठा; दुरुस्ती करताना युवकाचा शॉक लागून मृत्यू; दाताळा येथे दुर्दैवी घटना; डीपीवर काम करणाऱ्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील दाताळा येथे डीपीवर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने एका युवकाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.७) दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाताळा गावाजवळील पिंप्री गवळी फाट्यावर असलेल्या डीपीवर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्या वेळी डीपी बंद असल्याचे समजून काम सुरू करण्यात आले होते. मात्र अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने डीपीवर काम करत असलेल्या शुभम रामकृष्ण वानखेडे (वय २४, रा. वाडी, ता. नांदुरा) याला जोरदार विजेचा शॉक बसला. त्यानंतर तो खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत शुभमला तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच अॅड. हरीश रावळ, बगाडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, पत्रकार विलास खर्चे, अॅड. दिलीप तसेच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील कक्षसेवकांनी दिलेल्या मेमोवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश महल्ले, पोलीस हेडकॉन्स्टेबल टाकरखेडे व पोलीस कॉन्स्टेबल सचिन दासर यांनी रुग्णालयात पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे.