बस थांबवून एसटी चालक-वाहकाला बेदम मारहाण! सरकारी कामात अडथळा; प्रवाशांसमोर धिंगाणा घालणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा! 'हॉर्न का वाजवला?' या क्षुल्लक कारणावरून संतापजनक प्रकार;
चालकाचा शर्ट फाडला, वाहकालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या! तामगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारीनुसार, आशिष नुरमोहमद कुरेशी (वय ४९, रा. अकोट, जि. अकोला) हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव जामोद आगारात गेल्या १२ वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत आहेत. ५ ऑगस्ट रोजी ते वाहक योगेश मालगे यांच्यासह एमएच-४० AQ-६२४९ या बसवर कर्तव्य बजावत होते.संध्याकाळी साडेसातच्या सुमारास जळगाव जामोदहून सोनाळा मार्गे बस जात असताना करमोडा गावाजवळील रस्ते बांधकाम कंपनीसमोर अचानक एका व्यक्तीने रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीतून बाहेर येत बससमोर हात करून बस थांबवली.
तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने चालकाला, "माझ्या मोटारसायकलच्या मागून येताना हॉर्न का वाजवला, साईड का दिली नाही?" असा जाब विचारत अश्लील शिवीगाळ सुरू केली. चालकाने समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी थेट बसमध्ये चढला आणि चालकाच्या शर्टाची कॉलर पकडून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत चालकाच्या शर्टाची बटणे तुटली.यानंतर आणखी दोन साथीदार बसमध्ये घुसले. तिघांनी मिळून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. वाहकाला बसच्या खाली खेचून त्याच्या मानेवर, छातीवर आणि डोक्यावर मारहाण करण्यात आली. या झटापटीत त्याचा शर्ट फाटला आणि खिशातील पैसेही खाली पडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.बसमधील काही प्रवाशांनी मध्यस्थी करत दोघांची सुटका केली. मात्र जाताना आरोपींनी "पुन्हा दिसलात तर पाहून घेऊ" अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे.
यानंतर चालक-वाहकांनी बससह थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, या हल्ल्यामागे करमोडा येथील अमोल दिलीप वझे, अक्षय चरणदास वझे आणि अभिजित चरणदास वझे यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. शेकडो प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी सांभाळणाऱ्या चालक-वाहकांवर अशा पद्धतीने भररस्त्यात हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तामगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.