SPECIAL REPORT अनैतिक नैतिक वाटायला लागतं तेव्हा..! जिल्ह्यात पडतोय रक्ताचा सडा! 

  ३ महिन्यांत तब्बल १८ मर्डर, २५ जणांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न; ४१ बलात्काराच्या घटना; ५५ मुलींचे किडनॅपिंग...आणखी बरंच काही.
 
 बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..बातमीच्या शीर्षकात तुम्ही वाचलेली माहिती एक हजार एक टक्के खरी आहे. ही माहिती समाजमन हादरवणारी आहेच शिवाय समाजाला चिंतन देखील करायला लावणारी आहे. वाढत चाललेली गुन्हेगारी पोलिसांची देखील डोकेदुखी वाढवणारी आहे..शांत आणि संयमी अशी ओळख असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्याची गुन्हेगारीकडे होत असलेली ही वाटचाल सगळ्यांचीच चिंता वाढवणारी आहे..दिलासादायक बाब ही की अगदी किचकट गुन्ह्यांचा तपास बुलडाणा पोलिसांकडून यशस्वीपणे करण्यात आलाय..पण गुन्हे होऊच नये ही जबाबदारी तर खऱ्या अर्थाने समाजव्यवस्थेचीच आहे, पोलिसांना दोष देऊन काय फायदा?
बुलडाणा जिल्ह्यात नव्या वर्षांत गुन्हेगारीने थैमान घातले आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या ३ महिन्यांत तब्बल १८ खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ६ खून होत आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही सरासरी चिंताजनक आहे. याशिवाय २५ जणांना जीवनातून बाद करण्याचा प्रयत्न झालाय,म्हणजेच हाफ मर्डरच्या २५ घटनांची नोंद आहे.
अर्थात पोलिसांनी पोलिसांचे काम केले. १८ पैकी १८ खुनाच्या घटनेच्या पुराव्यानिशी यशस्वी तपास पोलिसांनी केला असून आरोपी सध्या जेलची हवा खात आहेत..
ही प्रकरणे गाजली..
जानेवारी महिन्यात मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे याने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा खून केल्याचे प्रकरण जिल्हाभर गाजले होते. त्यानंतर देऊळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीत जालना पोलिस दलातील पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के, अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील भागवत गिरी यांची हत्या, नांदुऱ्यात शेतीच्या वादातून पुतण्याने केलेली काकाची हत्या, जलंब येथील हत्याकांड, मलकापुरातील तृतीयपंथीयांचे हत्याकांड, मलकापूरातीलच प्रेमप्रकरणातून बहिणीच्या प्रियकराला संपवण्याचे प्रकरण आदी घटनांनी जिल्हा हादरला होता..
अनैतिक नैतिक वाटायला लागत तेव्हा...
 जिल्ह्यातील खुनाच्या घटनांच्या कारणांचा शोध घेतला असता बहुतांश घटना या "अनैतिक" प्रकरणातील आहेत. दाभाडीचा डॉक्टर गजानन टेकाळे याचे त्याच्या बायकोच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते. मात्र त्याला ते नैतिक वाटत होते, आपण चुकीच करतोय हे त्याला वाटतच नव्हतं, त्यातूनच त्याने जिवापाड प्रेम करणाऱ्या बायकोचा खून केला. देऊळगावराजाच्या गिरोली खुर्द येथील बाब्या म्हस्के तसाच..घरी पत्नी असताना त्याची नजर दुसरीकडेच होती,ती आपली नाहीये हे माहित असताना देखील तिला मिळवायचा प्रयत्न त्याने केला, त्यातून तब्बल ८ लाखांची सुपारी देऊन ज्ञानेश्वर म्हस्के या पोलिस कर्मचाऱ्याला कायमच संपवलं. काही घटना पैशांच्या, प्रॉपर्टीच्या वादातून घडल्यात, अर्थात तेही जे आपलं नाही ते मिळवण्याच्या अनैतिक हव्यासातूनच...त्यामुळे समाजातील घटक जेव्हा अनैतिकतेकडे वाटचाल करतात तेव्हा सावरण्याची जबाबदारी देखील समाजाचीच असते.
महिलांवरील अत्याचार वाढले? 
जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची देखील नोंद आहे. ३ महिन्यात ४१ बलात्काराच्या घटना जिल्ह्यातील विविध पोलस ठाण्यात नोंदवल्या आहेत. ४१ पैकी ४१ घटनांतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय ५५ अपहरणाच्या घटना नोंद असून त्यापैकी ३५ प्रकरणात पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. दुसऱ्या बाजूने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा विचार केला असता त्यात "लग्नाचे आमिष दाखवून वारंवार" बलात्कार केल्याचा घटना जास्त आहेत. म्हणजेच आधी इश्क नंतर शारीरिक संबंध आणि ब्रेकअप नंतर मात्र बलात्काराची तक्रार अशाच घटना जास्त आहेत.