कन्‍फर्म! देऊळगाव राजात कांड करणारेच चिखलीतील पोपट यांचे मारेकरी!!

आज संध्याकाळी ५ ला SP चावरिया उलगडणार हत्‍याकांडाचे रहस्य!
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील केवळ व्यापारीच नव्हे तर नागरिकांनाही हादरवून टाकणाऱ्या चिखलीतील व्यापारी कमलेश पोपट यांच्या हत्‍याकांडाचे गूढ अखेर आज, २५ नोव्‍हेंबरला सायंकाळी पाच वाजता उलगडणार आहे. बुलडाणा लाइव्हने जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याशी संपर्क साधला असता त्‍यांनी मारेकऱ्यांना पकडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, सायंकाळी पाचला पत्रकार परिषद घेऊन तपशीलवार माहिती देणार असल्याचे त्‍यांनी सांगितले.

१६ नोव्हेंबरच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास तीन चोरट्यांनी चाकूने भोसकून कमलेश पोपट यांची हत्या केली होती. आठवडा उलटूनही मारेकरी सापडत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या विरोधात व्यापाऱ्यांत नाराजी वाढत चालली होती. दुसरीकडे युद्धपातळीवर तपास सुरू होता आणि त्‍यात पोलिसांना यशही आले आहे. आज, २५ नोव्हेंबरला तिन्ही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सकाळपासून समाजमाध्यमांवर मारेकऱ्यांना पकडण्यात आल्याचे वृत्त फिरत होते. वृत्ताची शहनिशा करण्यासाठी बुलडाणा लाइव्हला अनेक वाचकांनी फोन केले होते. मात्र कन्‍फर्म न्यूज देण्याची परंपरा जपणाऱ्या बुलडाणा लाइव्हने "ब्रेकिंग'ला ब्रेक देत न्‍यूज पोलीस अधीक्षकांकडूनच कन्‍फर्म करून घेतली. त्‍यानुसार ते स्वतः सायंकाळी पाचला या कारवाईबद्दल पत्रकारांना सविस्तर सांगणार आहेत.

बुलडाणा लाइव्हच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडलेले तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर येत आहे. तिघेही २० ते २५ या वयोगटातील असून, दोघे धोत्रा नंदई (ता. देऊळगावराजा) तर एक देऊळगाव महीचा आहे. तो मूळचा रोहणा (ता. देऊळगाव राजा) येथील असल्याचे कळते. यापूर्वी तिघांनी देऊळगाव राजा येथील भावसार नामक व्यापाऱ्यालाही लुटल्याची माहिती समोर येत आहे. देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात तपास करत असतांनाच या हत्याकांडाचाही उलगडा झाल्याने चिखली पोलिसांवरील दडपण कमी झाले आहे. कमलेश पोपट यांची हत्या का करण्यात आली, याशिवाय या प्रकरणाच्या तपासाचा संपूर्ण तपशील जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया संध्याकाळी ५ वाजता चिखली पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत.