सोयाबीनची सुडी पेटवली; शेतकऱ्याचे साडेपाच लाखांचे नुकसान

मेहकर तालुक्‍यातील घटना
 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीनची सुडी पेटवून देऊन शेतकऱ्याचे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान करण्यात आल्याची घटना मेहकर तालुक्‍यातील जनुना शिवारात १५ नोव्‍हेंबरला सायंकाळी साडेपाचला घडली.
शेतकरी सुभाष काशिराम जाधव (रा. जनुना) यांच्‍या तक्रारीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध डोणगाव पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. जनुना शिवारात जाधव यांचे शेत आहे. त्‍यांनी सोयाबीनचे पीक काढून सोयाबीनची सुडी लावून ठेवली होती. तिथेच २० स्प्रिंकलर पाइपही ठेवले होते. कोणीतरी सोयाबीनची सुडी खोडसाळपणे पेटवून दिली. त्यामुळे ७० पोते सोयाबीन (किंमत ४ लाख २० हजार), त्यावरील २० स्प्रिंकलर पाइप (किंमत २२ हजार), ताडपत्री (किंमत साडेचार हजार रुपये) जळून गेली. सुडीच्‍या बाजूला असलेले मळणीयंत्राचेही (किंमत १ लाख रुपये) नुकसान झाले. असे एकूण ५ लाख ४६ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.