मुलाचे खोटे लग्न लावले अन् १ लाख ५ हजार उकळले; खामगावात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा!

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुलाचे खोटे लग्न लावून दिशाभूल केल्याचा आरोप करत मध्यप्रदेशातील ६० वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांतीलाल सुखराम बरले वय ६० रा. ग्राम गवल बडूद, जि. खरगोन, मध्य प्रदेश यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाकाल चौक, खामगाव येथे संबंधित प्रकार घडल्याचे नमूद आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात उषा सकळकळे रा. महाकाल चौक खामगाव, सोहम ऊर्फ राजेश वर्मा रा. अकोला, हरी इंगळे रा. अकोला आणि प्रज्ञा गायगोळ रा. खामगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या आरोपानुसार, आरोपींनी संगनमत करून त्यांच्या मुलाचे खोटे लग्न लावले. तसेच दिशाभूल व तोतयागिरी करून त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी भान्यासं २०२३ मधील कलम ३१८ (४), ३१९ (२) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.