प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ वरली मटका वाल्यांचा धिंगाणा, अंढेरा पोलिसांना कोणीतरी सांगा!
Jan 18, 2024, 20:02 IST
अंढेरा (ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देऊळगाव राजा तालुक्यातील शेळगाव आटोळ अवैध धंद्यावाल्यांचे केंद्रस्थान बनले आहे. तब्बल १० वर्षापासून सातत्याने या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहे. सदर परिसर अंढेरा पोलीस ठाण्या अंतर्गत येतो. त्यामुळे पोलीस करतात तरी काय? असा सवाल उद्भवत आहे. ज्या ठिकाणी वरली मटका वाल्यांचा सुळसुळाट असतो, दारू पिऊन धिंगाणा चालतो तेथून जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास भोगावा लागतो.
आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच विना परवाना दारू विक्री,मास विक्री आणि वरली मटक्याची दुकाने थाटली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या अतिक्रमित जागेवर ही दुकाने थाटली. या संदर्भात पोलीस डोळेझाक करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केल्या जातोय. सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे अशी एकच अपेक्षा वारंवार व्यक्त होतेय.