पिकाला पाणी देत असताना सर्पदंश; सुनगावातील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू...
Dec 17, 2025, 13:34 IST
सुनगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गव्हाच्या पिकाला पाणी देत असताना विषारी सापाने दंश केल्याने सुनगाव येथील तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना १५ डिसेंबर रोजी घडली. मनोहर मारोती वंडाळे (वय ३८) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
सुनगाव येथील मनोहर वंडाळे हे १५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या आपल्या शेतात गहू पिकाला पाणी देत असताना त्यांच्या पायाला विषारी सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच शेतात उपस्थित नातेवाइकांनी त्यांना तातडीने जळगाव जामोद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे सापाच्या दंशावरील आवश्यक लस उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे रेफर करण्यात आले.खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीअंती मनोहर वंडाळे यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर रात्री उशिरा नऊ वाजता सुनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे सुनगाव परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.