रात्री घरात झोपली, सकाळी पलंग रिकामा; नांदुरा तालुक्यातील युवती कुठे गेली?

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरातील सर्व काही सुरळीत होते. दिवसभराची कामे आटोपून कुटुंबीय रात्री निवांत झोपले होते. मध्यरात्रीपर्यंत सर्व काही ठीक असल्याची खात्रीही झाली होती. मात्र पहाट होताच एका कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. घरात झोपलेली १८ वर्षीय युवती अचानक बेपत्ता झाल्याने नांदुरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

घटना बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. युवतीच्या २१ वर्षीय भावाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २१ जून रोजी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य जेवण आटोपून घराच्या गच्चीवर झोपले होते. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने सर्वजण घरात आले आणि पुन्हा झोपले.

रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला जाग आली. त्यावेळी त्याची बहीण घरातच झोपलेली असल्याचे त्याने पाहिले. त्यामुळे सर्व काही सुरळीत असल्याची खात्री करून तो पुन्हा झोपला. मात्र काही तासांनंतर घडलेल्या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले.

२२ जून रोजी पहाटे सुमारे पाच वाजता आईची झोप उडाली. नेहमीप्रमाणे घरातील हालचाली पाहताना तिची नजर मुलीच्या पलंगाकडे गेली. मात्र पलंग रिकामा होता. सुरुवातीला घरातच कुठेतरी गेली असेल, असा समज करून कुटुंबीयांनी शोध सुरू केला. घरातील प्रत्येक खोली, अंगण, परिसर तपासण्यात आला. पण युवतीचा कुठेही मागमूस लागला नाही.वेळ जसजसा पुढे सरकत गेला, तसतशी कुटुंबीयांची चिंता वाढत गेली. नातेवाईक, परिचित, मित्रमंडळी आणि आसपासच्या गावांमध्येही चौकशी करण्यात आली. मात्र शोधमोहीम निष्फळ ठरली. युवती नेमकी कुठे गेली, कोणासोबत गेली की तिच्यासोबत काही अनपेक्षित घडले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

अखेर सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर कुटुंबीयांनी बोराखेडी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत हरवल्याची नोंद केली असून युवतीचा शोध सुरू केला आहे. बेपत्ता युवतीचा रंग सावळा, उंची सुमारे पाच फूट असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मध्यरात्रीपर्यंत घरात असलेली युवती पहाटेच्या काही तासांत नेमकी कुठे आणि कशी गायब झाली, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून या रहस्याचा उलगडा करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.