बुलढाणा जिल्ह्यातील लग्नात धक्कादायक घटना: सप्तपदीनंतर कपडे बदलण्याचा बहाणा! नवरी बेपत्ता; नवरदेवाचा डोक्यावर हात!  

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लग्नाचा उत्सव चालू असतानाच मोताळा तालुक्यातील एका गावात घडलेली धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सप्तपदी झाल्यानंतर नवरीने कपडे बदलण्यासाठी रूममध्ये जाण्याचा बहाणा करत लग्नमंडपातून गायब झाल्याची घटना घडली आहे.
घटना अशी आहे की, घाटावरून म्हणजेच बुलढाणा तालुक्यातील एका गावातून वर पक्ष मोताळा तालुक्यातील गावात विवाहासाठी आले होते. पारंपरिक पद्धतीने दिवसभर लग्नाचे सर्व विधी पार पडले. वर-वधू यांच्यावर अक्षतांचा वर्षाव झाला, एकमेकांना हार घालण्यात आले आणि फोटोसेशनही पार पडले.
रात्री सप्तपदी सोहळ्यानंतर नवरीने कपडे बदलण्यासाठी रूममध्ये जाण्याची विनंती केली. मात्र, बराच वेळ झाला तरी ती परत आलीच नाही. संशय आल्यावर रूम उघडून पाहण्यात आले असता, दुसऱ्या दरवाजातून ती पलायन केल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून नवरदेव व त्याच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे. सध्या नवरीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत .पोलीस यंत्रणेलाही याबाबत माहिती देण्यात आली नसल्याचे कळते . मात्र या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे...