धक्कादायक! वृद्ध दाम्पत्याला लोखंडी रॉडने हाणले, नंतर लुटले! चिखली तालुक्यातील अंचरवाडीची घटना..
Jul 17, 2024, 18:23 IST
चिखली(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) येथील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली. शेतातील घरामध्ये झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर पशुधनासह सोन्याचांदीचे दागिने असा एकुण १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली.
चिखली तालुक्यातील खामगाव जालना रोडवरील वसंतनगर बंजारा तांडा येथे आपल्या शेतातील छोट्याशा घरात वृद्ध दाम्पत्य झोपलेले होते. विष्णू राठोड आणि जिजाबाई असे त्या दोघांचे नाव आहे. या दोघांनी त्यावेळी विचारही केला नसेल इतका भयानक प्रसंग त्यांच्या सोबत घडणार आहे. रात्री १२ वाजेची वेळ होती. हे दोघेही गोठ्यातील गुरे ढोरे बांधून झोपले. बाहेर पावसाचे वातावरण, रिपरिप पावसाची सुरुवात अन् तेवढ्यात चोरी करण्याच्या उद्देशाने तीन चोरटे त्यांच्या शेतात पोहचले. गडद अंधार, परिसरात शुकशुकाट होता. आणि घरात धडधाकट कोणी नव्हतं! हे पाहून चोरट्यांनी सहजपणे घरात प्रवेश केला. कुणीतरी आल्याची चाहूल लागल्याने जिजाबाईला खडबडून जाग आली. घरात चोरटे घुसल्याचे पाहतच जिजाबाई हादरल्या आणि जोऱ्याने ओरडू लागल्या.
यातच त्यांचे पती विष्णू राठोड हे देखील झोपेतून दचकून उठले. पुढे चोट्यानीही त्यांचा प्रताप दाखवलाच. लोखंडी रोड दाखवून ते वृध्द दांपत्याला दमदाटी करायला लागले. एवढ्यावर न थांबता, असंवेदनशील चोरटे या वृध्द दाम्पत्याच्या जीवावर उठले. लोखंडी रॉडने चोरट्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. जिजाबाई राठोड यांच्या अंगावरील सोन्याचे, चांदिंचे, दागिने व शेताच्या गोठ्यातील पशुधन असा एकूण १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. जिजाबाई राठोड यांनी अंढेरा पोलीस स्टेशन गाठले. घडलेली सगळी घटना सांगितली. त्यांनतर पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. चोरटे अजूनही फरार असल्याचे समजते. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम ठाणेदार जारवाल हे करीत आहेत.