धक्कादायक! महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकावर दरोडेखोरांचा हल्ला; दगडफेकीत तीन वाहनांचे मोठे नुकसान...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा मुख्यालयात आयोजित महसूल क्रीडा स्पर्धा २०२६ संपल्यानंतर परतीच्या प्रवासात असलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दगडफेकीमुळे तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका महसूल सेवकास गंभीर दुखापत झाली आहे.
दिनांक १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार) रोजी महसूल क्रीडा स्पर्धा २०२६ अंतर्गत कार्यक्रम जिल्हा मुख्यालयी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम सकाळी ९ वाजेपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू होता.

कार्यक्रम संपल्यानंतर मेहकर उपविभागांतर्गत मेहकर व लोणार तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी अधिग्रहीत खाजगी वाहने तसेच वैयक्तिक वाहनांद्वारे आपल्या मुख्यालयाकडे परत निघाले होते.
मेहकर महसूल उपविभागातील महसूल सेवक कर्मचारी हे   नितीन त्र्यंबक नवघरे (वय अंदाजे ५५, रा. गौढाळा, ता. रिसोड, जि. वाशिम) यांच्या मालकीच्या अधिग्रहीत वाहन क्रमांक MH 28 AA 4810 (Mahindra Bolero Seater) मधून प्रवास करत होते. तर वाहन क्रमांक MH 28 BW 9098 (Swift VXI) मधून   अनंत मुरलीधर साळवे (वय ४०, महसूल सहाय्यक) व   अजयसिंह कंचनसिंह जोहरे (वय ४५, सहाय्यक महसूल अधिकारी) प्रवास करत होते. तसेच वाहन क्रमांक MH 28 CC 3346 (Tata Nexon) मधून   अरुण दौलतराव साबळे यांच्या पत्नी श्रीमती आरती अरुण साबळे (वय अंदाजे ३२, म.स.) व श्रीमती सविता नारायण भंडारे (वय अंदाजे ३२, म.स.) (सर्व तहसील कार्यालय, मेहकर) प्रवास करत होते. 
सदर सर्व वाहने रात्री सुमारे १० वाजता बुलढाणाहून निघून मेहकरकडे येत असताना, मौजे आमखेड फाट्यापासून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंदाजे २ कि.मी. अंतरावरील वळणावर, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी लुटमारीच्या उद्देशाने जोरदार दगडफेक करून वाहने अडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत वाहनांच्या काचा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहन क्रमांक MH 28 AA 4810 Bolero च्या समोरील व डाव्या बाजूच्या काचा तसेच दरवाज्याचे नुकसान होऊन अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. वाहन क्रमांक MH 28 BW 9098 Swift च्या बोनट व डाव्या बाजूच्या मागील दरवाज्यास नुकसान होऊन अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर वाहन क्रमांक MH 28 CC 3346 Tata Nexon च्या रुफटॉपला दगड लागून अंदाजे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र   धनराज शिंदे, महसूल सेवक यांच्या डाव्या डोळ्याला काच लागून गंभीर दुखापत झाली आहे. 
या गंभीर घटनेप्रकरणी तातडीने तक्रार दाखल करण्यात आली. मेहकर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.