धक्कादायक! शेतरस्त्याच्या वादातून गाेळीबार,एक जण जखमी; नांदुरा तालुक्यातील काेकलवाडी येथील घटना; दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल!
Jul 31, 2025, 13:27 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतरस्त्याच्या वादातून एकावर दाेघांनी गाेळीबार केल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील काेकलवाडी येथे २९ जुलै राेजी दुपारी घडली. या गाेळीबारात एक जण जखमी झाला असून नांदुरा पाेलिसांनी दाेघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कोकलवाडी येथील रहिवासी विष्णु रामकृष्ण भगत यांच्यासह आरोपी रामेश्वर दादाराव भगत आणि विनोद ज्ञानदेव भगत यांच्यात २०२३ पासून शेतरस्त्याच्या वापरावरून वाद सुरू आहे. वादग्रस्त शेती ही फिर्यादी विष्णु भगत यांच्या आत्या सुपडाबाई रामधन पांडे यांच्या मालकीची असून, विष्णु भगत ही शेती १९९६ पासून करत आहेत. शेतातील गाडीरस्त्यावर मुरूम टाकण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता.गावकऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद कायम राहिला. याआधीही आरोपींनी विष्णु भगत यांच्या पत्नी कविता भगत यांना त्यांच्या शेतातून जात असताना अडवून विष पाजल्याचा गंभीर प्रकार घडला होता. त्या प्रकरणी नांदुरा पोलिसांत भा.दं.वि. कलम ३०७ व ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ जुलै रोजी विष्णु भगत हे एमएच-१४-सीझेड-१४१५ क्रमांकाच्या चारचाकीने वडनेर ते मेंढळी रस्त्यावरील धोबी नावाच्या शेतात गेले होते. त्याचवेळी आरोपी रामेश्वर भगत व विनोद भगत हे एक मोटारसायकलवर, तर अन्य दोनजण दुसऱ्या मोटारसायकलवर आले. रामेश्वर भगतने आपली दुचाकी विष्णुच्या वाहनासमोर लावली. "तु माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का केली?" असे विचारत त्याने कमरेतील पिस्तुल काढून गोळीबार केला. एक गोळी वाहनाच्या दरवाज्यावर लागली, तर दुसरी गोळी विष्णुच्या उजव्या हातावर लागली. गोळीबार होताच विष्णु भगत यांनी मोटारसायकलला धक्का देऊन स्वतःच्या वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी विष्णु भगत यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामेश्वर भगत व विनोद भगत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ३ (५) तसेच कलम ३, २५ आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.गाेळीबाराच्या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.