धक्कादायक! मेहकर हादरले! तरुणाचा दगडाने ठेचून खून; खुनाला प्रेम प्रकरणाची किनार...

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकरच्या खंडाळा एमआयडीसी परिसरात आज सकाळी धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. मृतक तरुण मूळ मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील राहणारा असून राहुल खुशालराव बाजड असे तरुणाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी राहुलचा मृतदेह मेहकरच्या खंडाळा एमआयडीसी परिसरात दिसून आला. दगडाने ठेचून राहुलचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. राहुल काही वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातील जाम आढाव येथे मामाच्या गावी राहत होता. वाशिम जिल्ह्यातील केनवड येथे त्याने कापडाचे दुकान सुरू केले होते.
दरम्यान रात्री अज्ञात आरोपींनी राहुलचा दगडाने ठेचून खून केला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आलेवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, पोलीस उपनिरीक्षक जारवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण कटक, मोहम्मद परसुवाले यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तपासासाठी श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांकडून या घटनेचा वेगवान तपास करण्यात येत आहे, या घटनेला अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे..