धक्कादायक! माळेगाव प्रकरणातील आरोपीने घेतले विष; वनविभागाच्या अधिकाऱ्यावर केले गंभीर आरोप; अतिक्रमण हटविल्याबद्दल व्यक्त केला संताप..!
अतिक्रमण हटवून वनविभागाने आम्हाला बेघर केले. शेतीही मोडून काढल्याने आता पोट कसे भरायचे? असा सवाल संबंधित आरोपीने लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे.तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर या चिठ्ठीत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भीमसिंग शिवाजी गायकवाड (वय ५५) असे विष घेणाऱ्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोताळा वनपरिक्षेत्रांतर्गत माळेगाव परिसरातील शेकडो हेक्टरवर अतिक्रमण करून शेती वहिती करण्यात आली होती. तसेच तेथेच वस्ती तयार करण्यात आली. हे अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर आदिवासी भील्ल समाजातील लोक बेघर झाले. उपोषण व मोर्चा काढून या लोकांनी न्याय मागितला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अतिक्रमण हटवण्यासाठी वनविभाग आणि पोलिस गेले असता त्यांच्यावर संतप्त ग्रामस्थानी हल्ला केला होता. या प्रकरणी २६ जनाविरुध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यामध्ये भीमसिंग गायकवाड (वय ५५) यांचाही समावेश होता.गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते.अटकेच्या भीतीने
२९ जुलै रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना लक्षात येताच नातेवाइकांनी त्यास तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. पोलीस आपल्याला अटक करतील या भीतीने त्याने विष घेतल्याची चर्चा होत आहे.
तर दहा ते पंधरा आदिवासी करणार आत्महत्या
'जय आदिवासी, जय एकलव्य', विनंती विशेष सरकार यांना सादर. न्याय मिळणेबाबत. गेल्या तीस वर्षांपासून माळेगाव येथे कुटुंबासह राहात होतो. वन जमिनीवर पेरून पोट भरत होतो. भर पावसाळ्यात वनविभागाने गाव मोडले, राहण्यासाठी जागा उरली नाही. उपोषण केले. पुन्हा माळेगाव येथे घरे बांधली असता वनाधिकाऱ्यांनी खूप पैसा खावून घरे मोडली असता हल्ल्याचे प्रकरण घडले. त्याला वन अधिकारीच जबाबदार आहेत. 'घर मोडले, दार मोडले, उघड्यावर कसे राहणार? जमीन मोडली, पोट कसे भरणार? असा सवाल करून आत्महत्या करीत असल्याचे भीमसिंग गायकवाड याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. अजूनही दहा ते पंधरा दिवसांत भिल्ल आदिवासी आत्महत्या करणार आहेत, याचाही उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला आहे.