धक्कादायक! सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आई,वडिलांसह ग्रामस्थ धावून आल्याने वाचली अब्रु
५० वर्षीय नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल...
Oct 24, 2025, 13:29 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एका सात वर्षीय बालिकेला तुरीच्या शेतात नेऊन ५० वर्षीय नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे आई वडील आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावल्याने मुलीची अब्रु वाचली.ही धक्कादायक घटना शेगाव तालुक्यातील एका गावात घडली.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी ७ वर्षीय पीडिता ही तिच्या बहिणीसोबत शेतातून घरी येत होती.
दरम्यान, गावातीलच ५० वर्षीय व्यक्ती पीडितेला उचलून तुरीच्या शेतात घेऊन गेला. दरम्यान, पीडितेची मोठी बहीण घरी परतल्यावर तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी पीडितेचे आईवडील व इतर जण घटनास्थळी दाखल झाले.
पीडिता ही शेतातून परतत असताना दिसली. तिने नातेवाइक असलेल्या एका व्यक्तीने हात व तोंड बांधून शेतात नेले होते, पण आईबाबांचा आवाज ऐकून त्याने तिला सोडून दिल्याचे सांगितले.
याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता ७४, ९६, पोक्सो कायदा कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल सांगळे व तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुनील देव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.