शिवशाही बसची दुचाकीला जोरदार धडक; वर्दडी बु. येथील तरुणाचा मृत्यू..!

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जालना जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात वर्दडी बुद्रूक येथील ज्ञानेश्वर गणेश शिंदे (वय ३५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जालना–देऊळगाव राजा मार्गावरील जामवाडी शिवारात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर शिंदे हे जालना येथील जिजामाता कॉलनीमध्ये पत्नीसह वास्तव्यास होते. ते एका मसाला कंपनीत मार्केटिंग विभागात कार्यरत होते. कामानिमित्त ते दिवसभर देऊळगाव राजा येथे गेले होते. काम आटोपून सायंकाळच्या सुमारास ते दुचाकीने (क्र. एमएच-२१-एजे-६२९१) जालना येथे परतत असताना, मागून येणाऱ्या शिवशाही बसने (क्र. एमएच-०९-ईएम-८७२७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात ज्ञानेश्वर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांच्या भावाला नीलेश शिंदे यास घटनेची माहिती दिली. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, एक वर्षांची मुलगी, आई-वडील, काका, काकू व आजी असा परिवार आहे. दोन चिमुरड्यांचे पितृछत्र हिरावले गेल्याने वर्दडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी वर्दडी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 
करण्यात आला.
या प्रकरणी नीलेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून जालना तालुका पोलिस ठाण्यात शिवशाही बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राम शिंदे करीत आहेत.