शेगाव हादरले; पाठलाग, धमक्या अन् घरासमोर दहशत अल्पवयीन मुलीचा छळ; धमकावणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकावल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी ऋषिकेश संजय बोबडे (वय १७) हा तिचा सातत्याने पाठलाग करत होता. “माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुला आणि तुझ्या लहान भावाला जीवे मारून टाकेन,” अशा धमक्या देत तो तिला त्रास देत होता.
तसेच आरोपी ऋषिकेश बोबडे, हेमा संजय बोबडे व संजय बोबडे यांनी तक्रारदाराच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.ही घटना जानेवारी २०२५ पासून ते १४ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सिद्धेश्वर नगर परिसरात घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी १८ मार्च २०२६ रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक १६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७८, ३३३, ३५१(२), ३५२ तसेच पोक्सो कायदा कलम १२ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या सोबत पोलीस कर्मचारी निमिष मेहेत्रे व पीएसआय बरिंगे यांनीही भेट दिली.