शौचालयासाठी घराबाहेर पडली अन् पुढे जे घडलं ते संतापजनक!; दिव्यांग महिलेवरील बलात्काराने परिसर हादरला...! आरोपी "कवठळ"चा...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २१ जून रोजी घडली. पीडिता शौचालयासाठी जात असताना आरोपीने तिचा हात पकडून जबरदस्तीने शेतातील नाल्याकडे नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच शिवीगाळ करून मारहाण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी सचिन संजय मघाडे (वय ३६, रा. कवठळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार दीपक ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश देंढे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.