भीषण अपघातात नगरसेवकपतीसह सात जण जखमी: माजी आमदार संजय रायमुलकर यांची माणुसकी; स्वखर्चातून उपचार व रुग्णवाहिकांची व्यवस्था...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जानेफळ नजिक पालखी मार्गावर शनिवार, ता. ११ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वैजापूर (जि. संभाजीनगर) येथील नगरसेवकपतीसह सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर माजी आमदार संजय रायमुलकर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे व माणुसकीमुळे जखमींना वेळीच उपचार मिळू शकले.
शेगाव येथून संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन वैजापूरकडे परत जात असताना नगरसेवकपती श्रावण चौधरी यांच्यासह सात जण कारने पालखी मार्गे मेहकरकडे येत होते. जानेफळ ते गोमेधर दरम्यान पुलावरील खोलगट भागात कारने जोरदार उसळी घेतली. वाहन अनियंत्रित होऊन थेट शेतात जाऊन पलटी झाले.

योगायोगाने, अपघातस्थळी मागून येत असलेले माजी आमदार संजय रायमुलकर यांचे वाहन तिथेच होते. त्यांनी सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी व सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले. तत्काळ त्यांनी जानेफळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार आदिनाथ मोरे यांना घटनेची माहिती दिली.

या वेळी अंबिका अर्बनचे अध्यक्ष मोहन धोटे, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक अमर राऊत यांनीही जखमींच्या मदतीसाठी सहकार्य केले.
जखमी श्रावण चौधरी, अक्षय अडवाणी, निलेश कुफे, निलेश अडवाणी यांच्यासह अन्य तीन जखमींना संजय रायमुलकर यांच्या वाहनातून मेहकर येथील डॉ. सुधीर पाखरे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही उपचारासाठी मोलाचे सहकार्य केले. अपघाताची माहिती व जखमींच्या स्थितीबाबत वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना संजय रायमुलकर यांनी दूरध्वनीवरून अवगत केले.

जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्वतः उचलत, माजी आमदार संजय रायमुलकर यांनी रात्री ९ वाजता जखमींना वैजापूर येथे हलविण्यासाठी दोन खाजगी रुग्णवाहिका स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या माणुसकीच्या भूमिकेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.