खळबळजनक! देऊळगाव राजा वॉटरपार्कमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह...
Apr 10, 2026, 10:41 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील एका वॉटरपार्कमध्ये २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. ९) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जलतरण तलावांतील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नाशिक येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. कौटुंबिक कार्यक्रमासाठी देऊळगाव राजा येथे आलेल्या शुभमने कार्यक्रमानंतर मित्रांसोबत शहरातील वॉटरपार्कमध्ये भेट दिली होती. यावेळी पोहण्यादरम्यान तो पाण्यात बुडाला. उपस्थितांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेनंतर वॉटरपार्क परिसरात मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणानंतर वॉटरपार्कमधील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी प्रशिक्षित लाइफगार्ड होते का, तसेच आवश्यक सुरक्षासाधने उपलब्ध होती का, याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलतरण तलावांकडे वाढलेली गर्दी लक्षात घेता, संबंधित प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सदावर्ते कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला असून, संबंधित वॉटरपार्कच्या सुरक्षेचीही सखोल पडताळणी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.