खळबळजनक! ‘आम्ही IB अधिकारी आहोत’ म्हणत १० लाखांची मागणी; चितोड्याच्या तरुणाला खामगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
खामगाव शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील केला नगर येथील रहिवासी मोहन शामराव अरबट (वय ६१) यांनी ९ ऑक्टोबर रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. तक्रारीनुसार, २९ सप्टेंबर रोजी रात्री ८.२१ वाजेपासून ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपी गोपाल प्रल्हाद पोटे (वय ३०, रा. चितोडा, अंबिकापूर) आणि एका मोबाईल क्रमांकाच्या धारकाने संगनमत केल्याचा आरोप आहे.
या आरोपींनी अरबट यांच्या भावाशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधला. आपण आयबीचे अधिकारी असल्याची बतावणी करत बनावट ओळखपत्र दाखविण्यात आले. तसेच, संबंधित मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपद्वारे खोटी नोटीस पाठविण्यात आली.
मनी लॉन्ड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून १० लाख मागितले!
तुमच्या भावाविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगची कारवाई होणार असल्याचे सांगून संबंधितांना भीती दाखविण्यात आली. या माध्यमातून १० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली.
खामगाव शहर पोलिसांची कारवाई; आरोपी अटकेत
मोहन अरबट यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी गोपाल प्रल्हाद पोटे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बर्वे करीत आहेत. सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरवणे आणि पैशांची मागणी करणे, हा गंभीर प्रकार असून, अनोळखी व्यक्तींकडून व्हॉट्सॲपवर येणाऱ्या बनावट नोटिसा किंवा ओळखपत्रांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची अधिकृत यंत्रणेकडून खातरजमा करणे आवश्यक आहे.