खळबळजनक! आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू! भररस्त्यात अंगावर पेट्रोल घेऊन घेतले होते पेटवून...

 
 पिंपळगाव काळे (जळगाव जामोद) : पिंपळगाव काळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेले ६८ वर्षीय डॉक्टर चंद्रकांत विश्वासराव अवचार पाटील (रा. जळगाव जामोद) यांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. या गंभीर घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

 ही घटना ९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास निमगाव फाट्याजवळ घडली. डॉक्टर पाटील यांनी अचानक अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटविले. यामध्ये ते ९० ते ९५ टक्के जळाले होते. घटनास्थळी नागरिकांनी तातडीने धाव घेत ओम साई फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यानंतर डॉक्टर पाटील यांना प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मदतकार्यात ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, कृष्णा वसोकार, नांदुरा प्रेस क्लबचे अध्यक्ष विवेक पाऊलझगडे, विनोदबाप्पू देशमुख, सोपान धोटे, गजानन धोटे आणि पिंपळगाव काळे येथील सरपंच चौखंडे यांनी पुढाकार घेतला.
या घटनेने परिसरात तसेच पशुवैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर पाटील यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.