खळबळजनक! प्रेमात धोका झाला! तिचा जीव आता दुसऱ्यावर जडला, दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने तिने आधीच्या प्रियकराचा गेम केला! लोणार सरोवर परिसरात केला मर्डर...
Aug 7, 2024, 08:31 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार येथून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रेमप्रकरणात अडसर ठरू लागल्याने प्रेयसीने आपल्या आधीच्या प्रियकराचा गळा आवळून खून केला..यासाठी तिने तिच्या सध्याच्या प्रियकराची मदत घेतली..लोणार सरोवराच्या परिसरातील अभयारण्यात हे कांड झाले..प्रियकराचा मृतदेह जंगलातील जाळीत फेकून देण्यात आला..अखेर आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे..मृतक अर्जुन रोडगे आणि त्याचा खून करणारे हे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत..
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन रोडगे(२८, रा. रवळगाव, ता.सेलू जि.परभणी) असे मृतकाचे नाव आहे.अर्चना विठ्ठल सरोदे (२९, . रवळगाव, ता.सेलू जि.परभणी) व माऊली डुकरे(२४, खडूळा , ता. पाथरी, जि.परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. २ ऑगस्ट पासून अर्जुन गावातून बेपत्ता होता. त्यामुळे तशी तक्रार अर्जुनच्या वडिलांनी पोलीसांत दिली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना अर्जुनचे गावातील अर्चना सरोदे हिच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अर्चनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अर्चनाने अखेर अर्जुनचा खून केल्याची कबुली दिली. मृतक अर्जुन आणि अर्चनाचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. मात्र आता अर्चनाचा जीव दुसऱ्यावर जडला होता. माऊली डुकरे याच्याशी प्रेमप्रकरण सुरू झाल्याने अडथळा ठरणाऱ्या जुना प्रेमी असणाऱ्या अर्जुन ला कसे संपवायचे याचा विचार अर्चना करीत होती. अर्जुनला मात्र अर्चनाचे आपल्यावर अजूनही प्रेम आहे असेच वाटत होते..
असा झाला घात..
२ ऑगस्ट रोजी अर्चना आणि अर्जुन दिघे स्कुटीने फिरण्यासाठी लोणार सरोवर येथे आले. दोघे लोणार सरोवरात फिरायला गेले. मात्र इथे माऊली डुकरे आधीपासूनच दबा धरुन होता. सरोवरकडे जाणाऱ्या दर्गा रोडने असलेल्या चिंचेच्या झाडाखाली अर्चना आणि अर्जुन बसले..त्यावेळी आधीच ठरल्याप्रमाणे दबा धरून बसलेल्या माऊली डुकरे आणि अर्चना यांनी अर्जुनचा गळा आवळला. त्यानंतर अर्जुन चा मृतदेह जंगलातील घनदाट जाळीत फेकून देण्यात आला. नंतर अर्चना आणि माऊली डुकरे सोबत गावाकडे निघून गेले.
अर्चनाने ही सगळी स्टोरी पोलिसांना सांगितल्यावर ५ ऑगस्टच्या रात्री अर्चनाला घेऊन पोलीस लोणार सरोवरातील अभयारण्यात आले. मृतदेह कुठे फेकला होता याची माहिती घेतली. शोधाशोध केल्यानंतर अर्जुन चा मृतदेह सापडला. सरोवरातून मृतदेह वर आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत लागली. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणात आता माऊली डुकरे यालाही अटक केली आहे.