खळबळजनक! मालवाहू चालकाच्या क्रूरपणाचा कळस; धडक देवून जखमी केले, लोकांच्या भितीस्तव म्हणाला, दवाखान्यात भरती करतो अन् जंगलात फेकून दिले, जखमीचा तडफडून मृत्यू! जळगाव तालुक्यातील भीषण घटना..
May 4, 2024, 18:11 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी नेतो असे सांगून जंगलातील दरीत टाकून दिल्याची घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. परिणामी उपचाराअभावी अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील युवक मन्साराम छत्तरसिंग वासकले (२२ वर्ष) हा एका लग्नानिमित्त भिंगारा येथे गेला होता. लग्न आटोपल्यानंतर आपल्या दुचाकीने संध्याकाळी गावाकडे परत निघाला. दरम्यान निमखेडी ते सूनगाव रस्त्यावर मालवाहू पिकप क्रमांक एमएच २७ बीएक्स ५३८२ त्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालून त्याला धडक दिली. या अपघातात मन्साराम वासकले हा गंभीर जखमी झाला होता.
यावेळी घटनास्थळावर लोकांसमोर जखमी मनसाराम यास उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जातो असे मालवाहू चालकाने सांगितले होते. त्यानंतर लोकांच्या मदतीने आरोपी मालवाहू चालकाने मन्साराम याला गाडीमध्ये बसवून घेतले. परंतु त्यानंतर जखमी मन्सारामला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन न जाता आरोपीने बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतालगत असलेल्या जंगलात मन्साराम वासकले याला गाडीतून ढकलून दिल्याचे अमानवीय कृत्य केले.उपचार मिळाला नाही तर त्याचा मृत्यू होऊ शकतो असा विचारही आरोपीच्या मनात आला नव्हता. आरोपी मालवाहू चालकाने जंगलातील निर्जन ठिकाणी गंभीर जखमी असलेल्या मन्साराम याला टाकून दिले होते.
अखेर उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांना बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला आहे. तो अपघातात गंभीर असलेला मनसाराम हाच असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पाठवण्यात आला असून शवविच्छेदनाचे कार्य सुरू आहे.तपास चक्रे फिरली असता मालवाहू वाहन क्रमांकाच्या आधारे आरोपी योगेश सोपान महाजन (४० वर्ष) रा. बोरसर ता. जि. बरहानपुर यास अटक केली आहे. अमानवीय कृत करणाऱ्या आरोपीला कठोर स्वरूपाची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.