मुदत संपलेल्या रॉयल्टीवर अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त; बुलढाण्यात तहसीलदारांची मध्यरात्री कारवाई !

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुदत संपलेल्या रॉयल्टीच्या आधारावर अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्री बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी गस्ती दरम्यान पकडला. संबंधित मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून जप्त केलेला टिप्पर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. वाळू माफियांना कोणतीही माफी नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून तहसीलदारांनी दिला आहे.

जिल्ह्यातील पूर्णा आणि खडकपूर्णा या दोन प्रमुख नद्यांमध्ये वर्षानुवर्षे वाळू माफियांचे साम्राज्य फोफावले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर घाटावरील भागात अवैध वाळू वाहतुकीला आळा बसू लागला आहे. मात्र घाटाखालील भागात वाळू तस्करांचे धाडस वाढल्याचे चित्र दिसत आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातही घाटाखालून अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साधारण २ वाजता तहसीलदार विठ्ठल कुमरे आणि चालक अशोक देवकर गस्तीवर होते. मलकापूर रोडवरील रिलायन्स मॉलसमोर त्यांनी मिनी टिप्पर (क्र. एमएच-१९-सीएक्स-२८९५) अडवून चालक गोकुळ कांडेलकर याची चौकशी केली. चौकशीदरम्यान टिप्परचे मालक संजय रायबोले (रा. मलकापूर) असल्याची माहिती मिळाली. तसेच चालकाने दाखवलेली बुऱ्हानपूर (मध्यप्रदेश) घाटाची रॉयल्टी मुदत संपलेली असल्याचेही उघड झाले. त्यामुळे सदर टिप्पर जप्त करून शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला असून मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी २२ नोव्हेंबर रोजी सांगितले. बुलढाणा शहरात अवैध वाळू वाहतूक करताना कोणीही आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.