बकऱ्या चारण्याच्या कारणावरून हाणामारी, एकावर चाकूहल्ला! परस्पर तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हे... चिखली तालुक्यातील पळसखेड दौलतची घटना..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत शिवारात बकऱ्या चारण्याच्या कारणावरून राडा झाला. दोन गटात हाणामारी झाल्याने परस्पर तक्रारीवरुन ८ जनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पळसखेड दौलत येथील अर्जुन वामनराव पवार यांच्या - तक्रारीनुसार पळसखेड दौलत शिवारात त्यांच्यासह इतर असे पारधी समाजाची टिनपत्राची चार घरे आहे. याच भागात त्यांनी एक एकर ई-क्लास जमिनीत सीताफळ व आंतर पीक म्हणून तुरीची पेरणी केली आहे. या शेतात १७ जुलैला गोद्री येथील कैलास सांडु वाघ व अजय अशोक वानखेडे यांनी त्यांच्या बकऱ्या चारण्यासाठी घातल्या होत्या. त्या हाकलून दिल्याने वाघ व वानखेडे यांनी पाहून घेण्याची धमकी तथा जातीवाचक शिवीगाळ केली. सायंकाळी कैलास वाघ, अजय वानखेड़े सिद्धेश्वर घोलप, संतोष बकाल, ज्ञानेश्वर लहाने व अन्य काहींनी पारधी पाड्यावर संतोष सवण्या पवार, उदय मंजू पवार, अविनाश मंजु पवार, माया पवार, शांताबाई पवार, जेनिला पवार यांना मारहाण करत सामानाची नासधूस केली. यावरून कैलास वाघ, अजय वानखेडे, सिद्धेश्वर घोलप, संतोष बकाल, ज्ञानेश्वर लहाने व इतर ६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये, बीएनएस तसेच अनुसुचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत ३(२) (व्हीए), ३(२) (पाच) अंतर्गत गुन्हे दाखल झाले. 
  
चाकूने मारून एकास केले जखमी
याच प्रकरणात कैलास सांडु वाघ यांच्या तक्रारीनुसार ते शेळी पालनाचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे त्यांचे वडील सांडू वाघ, अजय अशोक वानखेडे हे गायरानात बकऱ्या चारताना अविनाश पवार यास थोडा बाजूने जा, कुत्रा चावेल असे म्हटल्याने त्याने चाकूचा धाक दाखवित शिवीगाळ केली. यावरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या पालावर जाऊन जाब विचारला असता अविनाश मंज्या पवार, उदय मंत्र्या पवार, अर्जुन वामन पवार यांनी शिवीगाळ केली. अविनाश पवारने चाकू आणून धमकी दिली. अर्जुन पवार व उदय पवार यांनी मारहाण केली. अविनाश पवार याने चाकू पाठीत मारून गंभीर जखमी केल्याची तक्रार कैलास वाघने दिली आहे. प्रकरणी अविनाश पवार, अर्जुन पवार व उदय मंज्या पवार या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.