देऊळगाव राजात शाळकरी मुलावर चाकूहल्ला; परिसरात खळबळ, शिवाजी शाळेसमोर सायंकाळी थरार; आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेश सखाराम विधाते (वय 15, रा. संजयनगर, देऊळगाव राजा) हा 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शाळेतून घरी जात असताना शिवाजी शाळेच्या गेटसमोर ही घटना घडली. यावेळी फिर्यादीचा चुलत भाऊ शुभम कुंडलिक विधाते (वय 16, रा. संजयनगर, देऊळगाव राजा) याच्यावर राहुल दीपक पिंपळे (रा. लालबाग, राजीव गांधी नगर, जालना) या तरुणाने धारदार चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.
हल्ल्यानंतर जखमी शुभम विधाते याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री 10.35 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जायभाये यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कांबळे करत आहेत.
शाळेच्या परिसरात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अल्पवयीन मुलांवरील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे का, हल्ल्यामागील नेमके कारण काय, याबाबत तपासातून अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.