सावरगाव डुकरें हादरलं! मुलानेच कुर्‍हाडीने केली आई-वडिलांची निर्दयी हत्या; त्यानंतर घेतला स्वतःचाही जीव! चिखली तालुक्यातील थरकाप उडवणारी घटना...

 
चिखली ( ऋषी भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आई वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्यानंतर मुलाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात घडली. ५ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्दैवी घटनेत वडील सुभाष डीगंबर डुकरे (७५), आई लता सुभाष डुकरे (६५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (४२) या तिघांचा मृत्यू झाला आहे. 
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून संपूर्ण घर सील करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहांना चिखली उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलवले आहे.

या हत्याकांडामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक वाद की मानसिक नैराश्य, यावरून पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरात हळहळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच ठाणेदार भूषण गावंडे यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली.