रेतीतस्करांची तलाठ्याला धमकी, उडवून टाकीन!

देऊळगाव राजा तालुक्यातील घटना
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांनी कारवाईसाठी आलेल्या तलाठ्याला धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आज, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास देऊळगाव मही- दिग्रस रोडवरील गॅस गोडाऊनजवळ घडली. याप्रकरणी तलाठ्याने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाळू मुंढे (रा. नारायणखेड, ता. देऊळगाव राजा) व गणेश विष्णू वाघ (रा. दिग्रस, ता. देऊळगाव राजा) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दिग्रस बुद्रूकचे तलाठी ज्ञानेश्वर हरी दांडगे (३०, रा. देऊळगाव मही) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी प्रेमानंद वानखेडे व कोतवाल भगवान ढोले अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी काल, १५ नोव्हेंबरला गस्तीवर होते. त्यांना दिग्रसकडून देऊळगाव महीकडे विनानंबर ट्रॉलीचे ट्रॅक्टर येताना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले, तेव्हा ट्रॅक्टर चालक व मालक बाळू मुंढे आणि गणेश वाघ यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला लोटपोट केली व उडवून टाकीन अशी धमकी दिली. ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. या तक्रारीवरून दोघांविरुद्ध  देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.