“गोरी ब्युटी क्रीम”च्या नावाने खामगावत बनावट उत्पादनाची विक्री; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त...

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रसिद्ध गोरी ब्युटी क्रीम अँड कॉस्मेटीक कंपनीच्या नावाने बनावट उत्पादनांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव शहरात उघडकीस आला आहे. स्थानिक गांधी चौकातील राजकुमार नोव्हेल्टी या दुकानावर पोलिसांनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे १९ हजार ३९८ रुपयांचे बनावट उत्पादने जप्त केली आहेत.
८ ऑक्टोबर रोजी मुंबईस्थित कंपनीचे अधिकारी रईसोदीन फजोद्दीन इनामदार (वय ५६) यांनी खामगाव पोलिसांच्या मदतीने राजकुमार नोव्हेल्टीवर छापा टाकला. तपासात दुकानात कंपनीच्या नावाने बनावट क्रीम आणि साबणाची विक्री होत असल्याचे समोर आले. यात गोरी ब्युटी क्रीम दोन नग (किंमत ९९८ रुपये) व ९२ साबण (प्रत्येकी किंमत २०० रुपये) असा एकूण १९,३९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, या उत्पादनांमध्ये “मेड इन पाकिस्तान” असे लिहिलेल्या लायकोपीन क्रीमचाही समावेश होता. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, अशा उत्पादनांची विक्री विशिष्ट समाजाला आकर्षित करण्याच्या हेतूने केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या प्रकरणी राजकुमार नोव्हेल्टीचे मालक लखमीचंद नेनुमाल चंदवाणी (रा. केशव नगर, खामगाव) यांच्याविरुद्ध कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ आणि ६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलिस करीत आहेत.