घरकुलाचे ६० हजार काढले, पण घर बांधण्याआधीच पैशांवर डल्ला! देऊळगाव माळीच्या शेतमजुराला मेहकरमध्ये चोरट्याने घातला असा गंडा; CCTV मध्ये सगळं कैद!
मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास १२ वाजता ही घटना घडली. देऊळगाव माळी येथील रहिवासी बबन दिगंबर जामकर (वय ५५) हे या चोरीचे बळी ठरले. जामकर हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांना घरकुल मंजूर झाले असून सध्या घराचे बांधकाम सुरू आहे.
घरकुलाच्या कामासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी जामकर यांनी मेहकर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतून आपल्या खात्यातील ६० हजार रुपये काढले. रक्कम घेऊन ते बँकेबाहेर पडले. मात्र, चोरट्याची त्यांच्यावर आधीपासूनच नजर असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
जुनी चिंच झाडाजवळील एका गोडाऊन परिसरात पोहोचल्यानंतर अज्ञात भामट्याने जामकर यांच्या शर्टावर घाण पदार्थ फेकला. त्यानंतर, “तुमच्या शर्टावर घाण लागली आहे,” असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. जामकर यांनी कॅरेटवर पैशांची पिशवी ठेवून शर्ट साफ करण्यास सुरुवात केली. नेमका याच संधीचा फायदा घेत चोरट्याने पैशांची पिशवी अलगद लांबवली आणि पसार झाला.
काही क्षणांनी पिशवी गायब झाल्याचे लक्षात येताच जामकर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरकुलासाठी मिळवलेली संपूर्ण ६० हजार रुपयांची रक्कम चोरीला गेल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.घटनेनंतर जामकर यांनी तातडीने मेहकर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संशयित भामटा पैशांची पिशवी घेऊन जाताना स्पष्टपणे कैद झाल्याचे समोर आले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.
बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, या घटनेनंतर सेंट्रल बँकेच्या मेहकर शाखेतील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाखेत सुरक्षारक्षक नसल्याने बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही बँकेच्या परिसरातून शेतकरी व नागरिकांचे पैसे चोरीला गेल्याचे प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.गरीब शेतमजुराने घर उभे करण्यासाठी कष्टाने मिळवलेली रक्कम अशा पद्धतीने लंपास झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, बँक प्रशासनाने तातडीने सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.