मोताळा स्टेट बँकेच्या बाहेर शेतकऱ्याचे ५० हजार लुटले; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दोन भामट्यांनी शेतकऱ्यासमोर पैसे टाकून शेतकऱ्याचे ५० हजार रुपये लुटल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील मुर्ती येथील शेतकरी प्रमोद एकनाथ खाकरे यांनी २७ऑक्टोबर रोजी नांदुरा रोडवरील भारतीय स्टेट बँक शाखा मोताळा येथून दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास ५० हजार रुपये काढले. ते पैसे घेवून जात असताना त्यांना दोन युवकांनी नितीन अॅग्रो कृषी केंद्रासमोर 'काका तुमचे पैसे पडले' अशी बतावणी केली. यावेळी खाकरे यांनी दुचाकी उभे करुन मागे आले, तेवढ्या वेळात त्या दोन भामट्यांनी त्यांच्या दुचाकी गाडीमध्ये समोर ठेवलेल्या डिक्कीतील ५० रुपये लंपास केले.


भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी खाकरे यांची चौकशी केली. मात्र, याबाबत बोराखेडी पोस्टेला खाकरे यांनी फिर्याद दिली नाही.