कोऱ्हाळा बाजारात बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल..!

 
 धामणगाव बढे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या  कोऱ्हाळा बाजार येथे चोरट्यांनी बंद घर फोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्या–चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी समोर आली. चोरट्यांनी ५ लाख १२ हजार ८५० रुपयांचा ऐवज लंपास केला.

याबाबत कारंजा लाड (जि. वाशीम) येथील रुषभ भिमकचंद बोहरा यांनी धामणगाव बढे पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या मामांचे घर – सुभाष रुपचंद जैन (रा. कोऱ्हाळा बाजार) – हे काही दिवस बंद होते. सुभाष जैन यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ते जळगाव खांदेश येथील डॉ. कोचर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते. उपचारानंतर ५ ऑक्टोबर रोजी ते घरी परतले असता घरातील सामान अस्ताव्यस्त व लाकडी कपाट फोडलेले आढळले.


कपाटातून ६० हजार रुपये रोख, सोन्याच्या पाटल्या (मूल्य ४ लाख ३ हजार), सोन्याची राखी (२,३५० रुपये), नथनी (८ हजार), दोन अंगठ्या (३५ हजार), चांदीचे शिक्के (१,५०० रुपये) आणि चांदीच्या चैनपट्या (३ हजार) असा एकूण ५ लाख १२ हजार ८५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.


 या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार नागेश जायले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल वरारकर पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.